
पीनेवालों को पीने का बहाना चाहिए असे म्हटले जाते. दारूच्या किमती कितीही वाढल्या तरी ती पिणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. पर्यटननगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये एकाच महिन्यात तब्बल ४३ लाख २७ हजार ५२६ लिटर दारू तळीरामांनी रिचवली आहे. यामध्ये बीयरची विक्री सर्वाधिक झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क रायगड विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
डिसेंबरमध्ये नाताळसह थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॉटेज पर्यटकांनी फुल्ल होती. दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी या कालावधीत जिल्ह्याला भेट दिल्याने मद्यविक्रीत प्रचंड वाढ झाली. अनेक ठिकाणी पाट्र्त्यांचे आयोजन करण्यात आले होते, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्रीचे परवानेही देण्यात आले होते.
ही आहे आकडेवारी
डिसेंबर महिन्यात ४३ लाख २७ हजार ५२५ बल्क लिटर इतकी दारू मद्यपींनी रिचवली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये ९ लाख ५१ हजार ३८१ बल्क लिटर देशी दारू, ९ लाख १४ हजार ४२६ बल्क लिटर विदेशी दारू, २४ लाख ९६ हजार ९६० बल्क लिटर बीयर आणि ६४ हजार ७५८ बल्क लिटर वाईन विकली गेली.
बीयरची विक्रमी विक्री
विदेशी दारूच्या किमतीमध्ये तीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याने मद्यपींनी बीयरकडे मोर्चा वळवला. त्यामुळे यंदा विदेशी दारूपेक्षा बीयर पिण्याकडे मद्यर्षीचा कल अधिक दिसून आला. वाढते पर्यटन, समारंभआणि महागलेली विदेशी दारू यांचा परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यात डिसेंबरमध्ये बीयरची विक्री विक्रमी झाली असल्याचे चित्र समोर आले आहे.

































































