रायगडमधील 2 लाख 37 हजार मतदार निवडणार 10 नगराध्यक्ष, 207 नगरसेवक; 107 प्रभागांसाठी 308 बुथवर होणार मतदान

रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. दहा नगर परिषदेतील १०७ प्रभागांसाठी ३०८ मतदान केंद्रांतून २ लाख ३७ हजार ५०३ मतदार १० नगराध्यक्ष आणि २०७ सदस्य निवडून देणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. खोपोली नगर परिषदेमध्ये सर्वाधिक ६२ हजार ७४ तर सर्वात कमी माथेरान नगर परिषदेत ४ हजार ५५ मतदार आहेत.

जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या दहा नगर परिषदांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारांनी आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.