
रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सुमारे दीड हजार आशा सेविकांची दिवाळी यंदा अंधारात जाणार आहे. या आशा सेविकांना गेल्या दोन महिन्यांपासून शासनाने मानधन दिले नाही. त्यामुळे त्यांना गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासह दसरा सण साजरा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता दिवाळीचा सण चार दिवसांवर आला असतानाही त्यांचे मानधन काढण्याच्या कोणत्याही हाल चाली शासकीय पातळीवर सुरू नाहीत. लागोपाठ दोन महिने मानधन न मिळाल्यामुळे या आशा सेविकांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास दीड हजारांहून अधिक आशा सेविका आहेत. आशा सेविकांच्या मदतीने शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचवल्या जातात. आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात देणे, माता-बालमृत्यूचे प्रमाण टाळणे, बालक व मातेचे आरोग्य राखण्याबरोबरच जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे, बालकांसह मातांचे लसीकरण करणे आदी कामेही आशा सेविकांना करावी लागतात. गावातील प्रसूत महिलेला दवाखान्यात नेण्यापासून त्यांचे आरोग्य राखण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारीही आशा सेविकांवर असते. कृष्ठरोग व इतर साथीच्या आजारांवर उपाय करण्यासाठी अंमल बजावणी करणे, जनजागृती करणे, आयुष्मान कार्ड काढण्यासाठी गावागावात प्रचार व प्रसार करण्याचे कामही आशा सेविका करीत असतात. राज्य शासनासह केंद्र शासनाच्या योजनांची कामे आशा सेविकांमार्फत केली जात आहेत. कामाचा इतका ताण असतानाही त्यांचे मानधन वेळेवर काढले जात नाही. गेल्या दोन महिन्यांपासून मानधन न काढल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे.
रिचार्ज भत्ताही मिळत नाही
शासनाच्या सर्व योजनांची कामे आशा सेविकांमार्फत केली जात आहेत, परंतु त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही. ऑनलाइन कामे आशा सेविकांकडून करून घेतली जात असली तरी त्यांना लागणारी यंत्रणा, पुरेसा रिचार्ज भत्ता दिला जात नाही. आशा सेविकांना फक्त राबवून घेतले जात आहे. शासनाकडून वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांना नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आशा सेविकांची नेहमीच पिळकवणूक
आशा सेविकांच्या मदतीने शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी केली जाते. तळागाळापर्यंत योजना पोहोचवून सर्वसामान्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम करतात. मात्र त्यांची प्रत्येक वेळी पिळवणूक केली जाते. ही फार मोठी शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया आशा सेविका प्रांजली कदम यांनी दिली आहे.
… तर तीव्र आंदोलन छेडणार
मानधन देण्यासाठी शासनाची भूमिका उदासीन दिसत आहे. जिल्ह्यातील सर्व आशा सेविकांना शासनाने दिवाळीपूर्वी मानधन द्यावे. चार दिवसांत जर मानधन मिळाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.
मागण्यांची दखल घेतली जात नाही
मागण्यांसाठी अनेक वेळा शासन दरबारी निवेदन दिले आहे. वरिष्ठ पातळीवर चचदिखील केली आहे, परंतु त्याची दखल घेतली जात नाही. दर महिन्याला वेळेवर मानधन मिळावे यासाठी अनेक वेळा विनंती करण्यात आली आहे. मात्र मानधन कधीच वेळेवर मिळत नाही, अशी खंत आशा सेविका वैशाली म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.