
अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिल्यानंतर आज रायगड जिल्ह्यात प्रथेप्रमाणे साखर चौथ गणपती विराजमान झाले आहेत. पनवेल, पेण, अलिबाग, नागोठणे, महाडसह जिल्ह्यात ९२८ बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दीड ते पाच दिवसांसाठी गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
पेण तालुक्यात गणपती मूर्ती बनवण्याचे काम वर्षभर सुरू असते. त्यामुळे भाद्रपद महिन्यातील मुख्य गणेशोत्सव मूर्तिकार व व्यावसायिक यांना साजरा करता येत नाही. त्यामुळे गणेशोत्सवानंतर येणाऱ्या पहिल्या चतुर्थीला मूर्तिकर गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. सद्यस्थितीत साखर चौथ गणेशोत्सव पेणसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही साजरा करण्यात येत असून जिल्हाभरात ९२८ गणपती मूर्तीची प्रतिष्ठापन करण्यात आली आहे.
साखर चौथच्या गणपती मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर पेणमधील मूर्तिकार पुढील वर्षाच्या गणेशोत्सवासाठी गणपती मूर्ती बनवण्याचे काम सुरू करतात. त्यामुळे साखर चौथ गणेशोत्सव मूर्तिकारांसाठी महत्वाचा मानला जातो. साखर चौथच्या गणेशोत्सवांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. तसेच काही जण नवस फेडण्यासाठी आपल्या घरी साखर चौथच्या गणेशाची प्रतिष्ठापना करत असल्याचे दिसून येते.
शिवसेनेचे रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांच्या नागोठणे येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या साखर चौथ गणपतीचे दर्शन घेताना नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय भिसे, प्रसिद्धीप्रमुख रोशन पत्की, कार्तिक जैन, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे.