
हातभट्टीसाठी काळ्या गुळाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना दिल्याने रोह्यात दारूमाफियांनी तुफान राडा केल्याची घटना समोर आली आहे. 20 ते 25 जणांच्या टोळक्याने एका तरुणावर सशस्त्र हल्ला करत दहशत माजवली. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी 16 जणांविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे राडा करणाऱ्या आरोपींमध्ये 11 महिलांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.
जंगलात हातभट्टीच्या गावठी दारूचे धंदे राजरोजपणे सुरू असून त्यासाठी लागणाऱ्या काळ्या गुळाची खुलेआम तस्करी होत असल्याची तक्रार घोसाळेजवळील बेलवाडी गावातील किशोर शेळके याने पोलिसांकडे केली होती. गावातील दिनेश शिंदे याच्या घरासमोर असलेल्या टेम्पोमधून गूळ आणल्याची खबर त्याने पोलिसांना दिली. याचाच राग मनात धरून दिनेश शिंदे, सुनीता शिंदे, विमल शिंदे, रंजना गोरे, संगीता गोरे, सविता होगडे, प्रमिला गोरे, स्वाती होगडे, शुभांगी गोरे, रमीबाई शिंदे, सुनील होगडे, योगेश होगडे, गणेश होगडे, रवी झोरे यांच्यासह 20 ते 25 जणांनी किशोरला बेदम मारहाण केली. याप्रकरणी रोहा पोलिसांनी 16 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात 11 महिलांचा समावेश आहे.
सराईत गुन्हेगारांचा समावेश
किशोर शेळके यांना मारहाण करणाऱ्या आरोपींमधील पाचजण हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात रोहा व रेवदंडा पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. जीवघेण्या हल्ल्यानंतर या सर्व आरोपींनी पोबारा केला असून ते अद्याप फरार आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप फड पुढील तपास करत आहेत.
























































