
भाताचे कोठार अशी एकेकाळी ओळख असलेल्या रायगडात गेल्या काही वर्षांत औद्योगिकरणात झपाट्याने वाढ झाली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यंदा जिल्ह्यात 81 हजार हेक्टरवर भात लागवड केली जाणार आहे, तर 2 हजार 550 हेक्टरवर नागली लागवड केली जाणार आहे. त्यासाठी खरीप हंगामाच्या मशागतीला ठिकठिकाणी सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भातपिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. जिल्ह्यात 81 हजार 335 हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्यात येणार आहे. यासाठी मशागतीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे. ठिकठिकाणी राब जाळण्याच्या कामात शेतकरी मग्न आहे. तसेच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी बांधाला लागून चर खोदणे, शेतीची बांधबंदिस्ती करण्याचे काम सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येते
आगामी भातपिकाच्या लागवडीसाठी बियाणांची कमतरता पडू नये यासाठी सुमारे 16 हजार 200 क्विंटल बियाणे कृषी विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बियाणांमध्ये जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत 2, कर्जत 3, कर्जत 4, कर्जत 5, कर्जत 7 यासह इतर बियाणांचा समावेश आहे.
खरीप हंगामात सुमारे 16 हजार 25 टन खत लागणार आहे. जिल्ह्यात खत पुरेसे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने खत कंपन्यांसोबत संपर्क साधला आहे. यामध्ये युरिया, एस.एस.पी., एम.ओ.पी. यासह इतर जातींच्या खतांचा समावेश आहे.
उत्पादन वाढवण्यावर भर
शेती क्षेत्रात होणारी घट लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतीची उत्पादकता वाढविण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांनी सुधारित आणि संकरित बियाणे घेण्यासाठी तसेच अधुनिक पीक लागवड पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. गेल्या वर्षी भाताची उत्पादकता प्रतिहेक्टरी 2 हजार 348 किलोग्रॅम होती. यावर्षी त्यात 2 हजार ९९5 किलोग्रॅमपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाचे आहे.