रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा तोडफोड प्रकरण; 73 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

1047

रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या मागे असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या 73 कार्यकर्त्यांची माणगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जहांगीरदार यांनी पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लाडक्या वाघ्या कुत्र्याची समाधी आणि पुतळा जगदीश्वर मंदिर परिसरात महाराजांच्या समाधीच्या मागे आहे. 2012 साली वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला होता. या घटनेनंतर साऱ्या महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. संभाजी ब्रिगेडच्या 73 कार्यकर्त्यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर दरोडा घालण्याचा आणि पोलिसांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी वापरलेल्या गाड्याही जप्त केल्या होत्या.या घटनेनंतर रायगड पोलिसांनी काही तासातच कार्यकर्त्यांना अटक केली होती.  महाड न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली होती. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसविला होता.

महाड न्यायालयातून हा खटला माणगाव न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. आज त्याची अंतिम सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आरोपीविरोधात कोणताही पुरावा नसल्याने सर्व आरोपींना निर्दोष सोडले आहे. आठ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला.

आपली प्रतिक्रिया द्या