
रायगड जिल्हा परिषदेच्या तळवली शाळेच्या परसबागेत विद्यार्थ्यांनी चक्क भाजीचा मळा फुलवला आहे. कडधान्य आणि विविध प्रकारच्या भाज्या लावण्यात आल्या असून अभ्यासाबरोबरच येथील मुलांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे शिक्षक देत आहेत. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे.
तळवली शाळेत नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात येतात. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन त्याची आखणी केली जाते. मुख्याध्यापक मस्तान बोरगे आणि उपशिक्षक सुरेश मांडे यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना भाजीपाल्याची लागवड कशी करायची याचे प्रशिक्षण दिले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी भेंडी, वांगी, दुधी, मिरची, पालक, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, मुळा, काकडी आणि कडधान्यांची लागवड केली. या भाज्यांचा समावेश विद्यार्थीआपल्या आहारात करत आहेत. स्वतः पिकवलेल्या भाजीपाल्याचा आस्वाद घेताना मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव तरळले होते.
विद्यार्थ्यांना खत कसे तयार करायचे याचे मार्गदर्शन दिले जात आहे. शाळेच्या सभोवताली अनेक वृक्ष असून यांचा पडलेला पाला कुजून खताची निर्मिती केली जात आहे. शिवाय मुलांच्या स्वच्छतेसाठी ठेवण्यात आलेले पाणी पाटाच्या माध्यमातून लागवड केलेल्या भाजीपाल्यापर्यंत पोहोचत आहे.




























































