‘व्हिस्टाडोम’ कोच रखडल्याने रेल्वेमंत्र्यांनी आयसीएफचे कान उपटले

सामना ऑनलाईन । मुंबई

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच एक बैठक घेऊन रेल्वेच्या अनेक प्रलंबित विषयांचा आढावा घेतला. या बैठकीत चेन्नईच्या आयसीएफ कारखान्याने पर्यटनवाढीसाठी वेळेत ‘व्हिस्टाडोम कोच’ तयार न केल्याने आयसीएफच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मध्य रेल्वेने पर्यटनवाढीसाठी माथेरानच्या राणीला पारदर्शक ‘व्हिस्टाडोम कोच’ लावण्याचा प्रयोग केला आहे. यापूर्वी दादर-मडगाव जनशताब्दी गाडीतही अशा प्रकारचा पारदर्शक काचेचा छत असणारा ‘व्हिस्टाडोम कोच’ बसविला आहे. आता अशाप्रकारचे कोच डेक्कन क्वीन, पंचवटी आदी गाडय़ांनाही बसविण्याची योजना आहे. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत व्हिस्टाडोम डबे तयार न झाल्याबद्दल आयसीएफकडे विचारणा केली. त्यावर निधी मिळाला नसल्याचे उत्तर आयसीएफच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याने रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.