एसी लोकलमध्ये टीसी दिसताच प्रवासी काढतात तिकीट, RailOne अ‍ॅपच्या त्रुटीमुळे रेल्वे प्रशासनाला डोकेदुखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्याने सुरू करण्यात आलेल्या RailOne तिकीट अ‍ॅपमध्ये गंभीर त्रुटी उघडकीस आली असून, प्रवासी चालत्या लोकलमध्ये असतानाही अनारक्षित तिकीट बुक करू शकत असल्याचे समोर आले आहे. या geo-fencing प्रणालीतील बिघाडामुळे तिकीट न घेता प्रवास रोखण्यासाठी ठेवलेली महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा निष्प्रभ ठरली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे (CR) प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या अ‍ॅपमधील geo-fencing सुविधा फक्त स्टेशन परिसरातच तिकीट बुकिंगला परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ती प्रवाशांना प्रवासादरम्यानही तिकीट बुक करण्यापासून रोखू शकत नाही. मार्च महिन्यापासून अशा अनेक घटना समोर आल्या असून, कल्याणकडे जाणाऱ्या एसी लोकलमध्ये तपासणीदरम्यान एका प्रवाशाने प्रवास सुरू असतानाच तिकीट काढल्याचे उघड झाले.

मध्य रेल्वेने ही बाब लक्षात येताच RailOne विकसित करणाऱ्या Centre for Railway Information Systems (CRIS) यांना पत्र लिहून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उभे असताना तिकीट काढण्याची सुविधा मिळावी; मात्र एकदा ट्रेन सुरू झाल्यानंतर बुकिंग पूर्णपणे बंद व्हायला हवे.

दरम्यान, प्रवासी संघटनांनीही यावर उपाय सुचवले आहेत. रेल्वे युजर सल्लागार समितीचे सदस्य राजीव सिंघल यांनी सांगितले की, अ‍ॅपमधून फक्त स्टेशन परिसरातच तिकीट बुकिंगची परवानगी दिल्यास समस्या सुटू शकते. मात्र तांत्रिक मर्यादांमुळे सिग्नलची रेंज स्टेशनपुरती मर्यादित ठेवणे कठीण असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर एसी लोकलमधील बिना तिकीट करणारे प्रवाशी वाढत असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली आहे. गर्दीच्या वेळी अनेक प्रवासी उशीर होत असल्याने तिकीट न घेता एसी लोकलमध्ये चढतात. यामुळे गर्दी वाढते आणि गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी एसी लोकल गाड्या दररोज सरासरी 10 ते 15 मिनिटे उशिरा धावत असल्याचेही समोर आले आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर याचा सर्वाधिक परिणाम दिसत आहे. सीएसएमटी–पनवेल हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू झाल्यापासून 8 ते 10 मिनिटांचा उशीर नियमित झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार मध्य रेल्वेची वेळेची अचूकता 92 टक्के आणि पश्चिम रेल्वेची 95 टक्के असल्याचा दावा केला जातो. मात्र, 5 मिनिटांपर्यंतचा उशीर “वेळेत” मानण्याच्या निकषावर प्रवासी संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या वेळेत धावत नाहीत, हे वास्तव आहे. प्रवासी आता उशिराला सरावले आहेत.” प्रवाशांच्या मते, सिग्नल बिघाड, ट्रॅक मेंटेनन्स, अतिक्रमण आणि पूर्वसूचना न मिळणे ही उशीराची प्रमुख कारणे आहेत.

तसेच, एसी लोकलमध्ये दरवाजे बंद होण्यास अडथळा निर्माण करणारे प्रवासीही उशिराचे कारण ठरत आहेत. दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याशिवाय गाडी पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे एका गाडीला 5-7 मिनिटांचा उशीर झाला तरी त्याचा परिणाम पुढील गाड्यांवर होत जाऊन उशीर 20-25 मिनिटांपर्यंत वाढतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.