
मुंब्रा येथील अपघातानंतर प्रवाशांनी रेल्वे मंडळ आणि रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा रोष शमवण्यासाठी सर्व साध्या लोकलना स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा केली. स्वयंचलित दरवाजे असलेली नवीन डिझाईनची पहिली लोकल जानेवारीमध्ये उपनगरी रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल. याव्यतिरिक्त 238 वातानुकूलित लोकल प्रवासी सेवेत आणल्या जातील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने सोमवारी जाहीर केले.
मुंब्य्रातील अपघातानंतर रेल्वेमंत्री आणि रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरीसोबत बैठक घेतली. या बैठकीत लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसविण्याबाबत चर्चा झाली. साध्या लोकलच्या रचनेत बदल करून हवा खेळती राहील, अशा पद्धतीची रचना लोकलमध्ये करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हवा खेळती राहण्यासाठी साध्या लोकलच्या स्वयंचलित दरवाज्यांना लूव्हर्स (हवेशीर पट्टय़ा) तसेच लोकलच्या छतावर व्हेंटिलेशन युनिट लावले जाणार आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी लोकलच्या एका डब्यामधून दुसऱ्या डब्यामध्ये जाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
वेळापत्रक कोलमडणार
स्वयंचलित दरवाजे उघडण्यासाठी 5 सेकंद तर बंद होण्यासाठी 15 सेकंद लागतात. गेटवर गर्दी झाल्यास दरवाजा बंद होण्यासाठी 1 मिनिट लागू शकते. या वेळेचा विचार करता लोकलचे नियमित वेळापत्रक कोलमडून प्रवाशांना आणखी त्रास होऊ शकता, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
रेल्वे प्रशासनाकडून दिवसभर दिशाभूल
रेल्वे प्रवासी लोकलमधून खाली कसे पडले, याचे नेमके कारण सांगण्यास मध्य रेल्वे प्रशासन दिवसभर अपयशी ठरले. रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांवर मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी मुलाखत देताना वेगवेगळी कारणे दिली. एका प्रवाशाला उलटीचा त्रास झाला, लोकलमधील प्रवाशांमध्ये वादातून धक्काबुक्की झाली तसेच काही प्रवाशांनी रील्स बनवण्याचा प्रयत्न केला, अशी कारणे सांगून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनाच जबाबदार धरण्याचा आटोकाट प्रयत्न दिवसभर जारी ठेवला.