
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांमध्ये पुरुषांना तिकिटात 40 टक्के तर महिलांना 50 टक्के सवलत दिली जात होती. परंतु कोरोनाकाळात रेल्वेच्या प्रवासी उत्पन्नात घट झाल्याने ही सवलत सध्या तरी चालू ठेवणे शक्य नसल्याचे लेखी उत्तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिले आहे. त्यामुळे यापुढे ज्येष्ठ नागरिकांना सर्वसाधारण दरात प्रवास करावा लागणार असल्याने त्यांच्या खिशाला चांगलाच चाट पडणार आहे.
कोरोना काळात 20 मार्च 2020 पासून रेल्वेने केवळ चार वर्गवारीची रेल्वे तिकिटातील सवलत कायम चालू ठेवली आहे. यात दिव्यांगजन (अपंग), विविध 11 दुर्धर व्याधीचे रुग्ण आणि विद्यार्थी यांचा समावेश आहे. कोविड साथीमुळे रेल्वे प्रवासावर निर्बंध आल्यामुळे सन 2020-21 आर्थिक वर्षामधील एकूण प्रवासी उत्पन्न सन 2019-20 च्या कोविडपूर्व काळाच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासातील सवलती चालू ठेवल्याने रेल्वेच्या तिजोरीवर भार पडत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वर्गातील प्रवासी तिकिटातील सवलत सध्याच्या घडीला चालू ठेवणे अशक्य असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना स्पष्ट केले आहे.
या चार वर्गवारीची सवलत कायम…
रेल्वे बिकट आर्थिक परिस्थितीतून जात असूनही दिव्यांगजन, विविध अकरा प्रकारच्या दुर्धर व्याधीचे रूग्ण आणि विद्यार्थी आदी चार वर्गवारीकरिता तिकिटातील सवलत यापुढेही कायम ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वेने आधीच तिकीट आरक्षण फॉर्म भरताना ज्यांना ही सवलत घ्यायची नसेल त्यांना अर्जात त्याचा स्पष्ट उल्लेख केल्यास सवलत दिली जात नव्हती. आणि अशा प्रकारे स्वत:हून सवलत नाकारणार्यांचेही प्रमाण अलीकडे वाढले होते असे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.




























































