सेक्सटॉर्शनला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या

अश्लील व्हिडीओ यूटय़ूबवर अपलोड करण्याची धमकी देऊन होत असलेल्या सेक्सटॉर्शनला कंटाळून रेल्वे कर्मचाऱ्याने लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मृत व्यक्ती मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉप येथे काम करायची. काही दिवसांपूर्वी सायबर ठगाने त्याना कॉल केला. त्यानंतर ठगाने त्याना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. फेसबुकवर ओळख झालेल्या एका महिलेने त्याना तो अश्लील व्हिडीओ यूटय़ूबवर अपलोड करू अशी धमकी दिली. ठगाने कारवाईची भीती दाखवून त्याच्याकडून दोन लाख रुपये उकळले होते. पैसे दिल्यानंतर ठगांनी त्याच्याकडे पुन्हा पैशासाठी तगादा लावला होता.

सायबर ठगांकडून होत असलेल्या सेक्सटॉर्शनला ते कंटाळले होते. मृत व्यक्ती हे सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी घरातून निघाले. दुपारी ते माटुंगा रेल्वे स्थानकात आले. त्याने धावत्या लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येची माहिती समजताच दादर रेल्वे पोलीस घटनास्थळी गेले. घटनास्थळी पोलिसांना त्याच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यावरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. आत्महत्येची माहिती त्याच्या पत्नीला दिली. त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून दादर रेल्वे पोलिसांनी एक महिलेसह अन्य दोनजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.