रेल्वेची जनरल तिकिटेही आता एका क्लिकवर, यूटीएस मोबाईल अ‍ॅपवर तिकीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

रेल्वे प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागू नये, अगदी सहज व सोप्या पद्धतीने जनरल तिकीट काढता यावे, यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुढाकार घेतला आहे. पुणे विभागाच्या सर्व रेल्वे स्टेशनवर यूटीएस मोबाईल अ‍ॅपद्वारे एका क्लिकवर रेल्वेचे जनरल तिकीट काढण्याची सोय प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे रुळापासून दोन किलोमीटरच्या परिसरामधून या अ‍ॅपद्वारे तिकीट बुक करता येणार आहे. ही सुविधा येत्या शुक्रवारपासून (दि. १२) कार्यान्वित होणार असून, त्याद्वारे रेल्वेचा कारभारही पेपरलेस होण्यास मदत होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने आरक्षित तिकिटांसाठी यापूर्वीच ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, जनरल तिकिटे ऑनलाइन पद्धतीने बुक करण्याची कोणतीही सोय अद्यापप़र्यंत उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहूनच रेल्वेचे जनरल तिकीट काढावे लागत होते. मात्र, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे जनरल तिकिटांवर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. पुणे विभागातील सर्व स्टेशनवर यूटीएस या मोबाईल अ‍ॅपद्वारे एका क्लिकवर जनरल तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांना सोप्या पद्धतीने तिकीट काढता यावे आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अ‍ॅपद्वारे तिकीट बुक केल्यानंतर छापील तिकीट दाखविण्याची गरज नाही. मोबाईलमध्ये बुक केलेले तिकीट दाखविले तरी पुरेसे होणार आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपवर एकदा तिकीट बुक केल्यानंतर प्रवासादरम्यान ऑफलाइन पद्धतीनेही हे तिकीट प्रवासी तिकीट तपासणीसाला दाखवू शकणार आहे. तसेच अ‍ॅपद्वारे बुक केलेल्या तिकिटाचे आर-वॉलेटच्या माध्यमातून पैसे भरल्यास संबंधित तिकिटावर ५.५ टक्के सूट मिळणार आहे. दरम्यान, या अ‍ॅपद्वारे एकदा बुक केलेले तिकीट रद्द करता येणार नाही.

यूटीएस हे मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. प्रवाशाला आपला मोबाईल नंबर, नाव, लिंग, जन्मतारीख, आयडी कार्ड नंबर, शहर अशा प्रकारची माहिती भरून हे अ‍ॅप रजिस्टर करता येणार आहे. त्यानंतर एसएमएसद्वारे संबंधित प्रवाशाला लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळेल. दरम्यान, तिकीट बुक केल्यानंतर त्याचे पैसे भरण्यासाठी आर-वॉलेटचा वापर करावा लागणार आहे, असे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.