आता अमेरिकन रोबो करणार रस्ते, रेल्वे ट्रॅकची सफाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

थोडासा पाऊस पडला की रेल्वे ट्रक तुंबण्याची समस्या यंदा दूर होण्याची शक्यता आहे. रेल्वे ट्रकच्या बाजूचे आणि रस्त्यांखालील लहानलहान कल्व्हर्ट साफ करण्यासाठी पालिका अमेरिकन रोबोचा वापर करणार आहे. असे अत्याधुनिक ‘रोबो’ यंत्र येत्या एप्रिलपासून वापरात येणार आहे. अमेरिकेतील पश्चिम व्हर्जिनिया येथून हा रोबो आयात करण्यात येणार आहे. त्यामुळे कामगारांचे श्रम वाचणार आहेतच, पण विषारी वायूचा धोकाही टळणार आहे.

पावसाच्या पाण्याचा सुयोग्य निचरा होण्यासाठी रेल्वे ट्रकच्या व रस्त्यांच्या खाली अनेक ‘कल्व्हर्ट’ (मोरी) बांधण्यात आल्या आहेत. या कल्व्हर्टची साफसफाई महापालिकेच्या पर्जन्यजल खात्याद्वारे केली जाते. मात्र बहुतांश कल्व्हर्टची उंची कमी असल्यामुळे आत जाण्याची जागा अरुंद असते. यामुळे कल्व्हर्टची साफसफाई व्यवस्थित होत नाही. आतापर्यंत अशा ठिकाणी कामगाराला पाठवून सफाई करावी लागत होती. या ‘कल्व्हर्ट’मध्ये सहजपणे जाऊन साफसफाई करू शकेल असे अत्याधुनिक ‘रोबो’ यंत्र आणण्याचे पालिकेने ठरवले आहे.

असे आहे यंत्र
एका वेळी जास्तीत जास्त 700 किलो वजनाचा गाळ काढण्याची क्षमता असलेल्या या यंत्राची उंची व रुंदी केवळ 42 इंच, तर लांबी 120 इंच आहे. हे यंत्र 360 अंशात ‘गोल’ फिरत असल्याने अत्यंत निमुळत्या किंवा अरुंद जागेतही या यंत्राद्वारे साफसफाई करणे शक्य होणार आहे. हा रोबो ‘रिमोट कंट्रोल’ द्वारे ‘ऑपरेट’ केला जाणार असल्याने दूर अंतरावर राहून ‘कल्व्हर्ट’ची साफसफाई करणे शक्य होणार असल्यामुळे ‘कल्व्हर्ट’ मध्ये असणाऱ्या विषारी वायूचा धोकाही टळू शकेल.