कर्जतहून मुंबईत पोहचा पावणेदोन तासांत, पनवेल ते कर्जत नव्या रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना मिनिटांचेच काय सेकंदाचेही मोल कळते. त्यामुळे ते सारखे इंडिकेटर पाहून लोकल पकडण्याची घाई करीत धावत असतात. अशात मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-3 अंतर्गत कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा पर्यायी मार्ग वेगाने तयार होत असल्याने मुंबईकरांच्या प्रवासाची 25 ते 30 मिनिटांची बचत होणार आहे.

पनवेल ते कर्जत या एकूण 29.6 कि.मी.च्या रेल्वे मार्गिकेमुळे मुंबईकराच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. सध्या कर्जत ते सीएसएमटीला धिम्या लोकलने येण्यासाठी 2 तास 19 मिनिटे लागतात. हा मार्ग कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा जोडला गेल्याने हा लोकल प्रवास 1 तास 50 मिनिटांचा होणार आहे. या प्रकल्पासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला 2,782 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गाचे अर्थ वर्कचे (जमिनीवरचे काम) कंत्राट तसेच छोटे ब्रिज, रेल्वे फ्लायओव्हर, उड्डाणपूल तसेच रोड अंडर ब्रिजचे कंत्राट यांना अंतिम स्वरूप दिले आहे. या तीन कंत्राटांसाठी साइटवर जमीन सपाटीकरणाची प्राथमिक कामे सुरू असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.

असा बांधला जात आहे मार्ग

सध्या पनवेल आणि कर्जत यांना जोडणारा मार्ग एकेरी असून तो पनवेल, खालापूर आणि कर्जत तालुक्यातून जातो. काही मालगाडय़ा तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ा त्यावरून धावतात. हा मार्ग दुपदरी करण्यात येत आहे. नवा प्रस्तावित पनवेल-कर्जत मार्ग सध्याच्या मार्गाला जवळपास समांतर बांधण्यात येत आहे. सध्याच्या मार्गावर दोन बोगदे आहेत. नव्या मार्गावर तीन बोगदे बांधण्यात येणार आहेत. 220 मीटर लांबीचा एक बोगदा नधालजवळ बांधला जात असून दुसरा सुमारे 2600 मीटर लांबीचा आणि तिसरा वावराळे आणि कर्जतदरम्यान बांधला जात आहे.

1800 झाडे तोडावी लागणार

पनवेल-कर्जतदरम्यानची सुमारे 1800 झाडे रेल्वे मार्गाची आखणी करण्यासाठी तोडावी लागणार आहेत. वृक्षतोडीचा परिणाम कमी करण्यासाठी 1ः5 या प्रमाणात नवीन झाडे लावण्यात येतील. एकूण या मार्गावर 9,000 नवीन झाडे लावण्यात येणार आहेत. या मार्गावर पनवेल, चिखले, मोहोपे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके असणार आहेत.

  • टार्गेट डेट – मार्च 2025 –
  • मार्गाची लांबी – 29.5 किलोमीटर
  • तीन बोगद्यांची एकूण लांबी – 3.12 कि.मी.
  • 2,782 कोटींचा निधी मंजूर
  • रेल्वे स्थानके – 5
  • मोठे पूल – 8
  • रेल्वे उड्डाणपूल – 2
  • छोटे ब्रिज – 36
  • पुलाखालील रस्ते -15
  • उड्डाणपूल – 7