
लोकल प्रवाशांच्या तक्रारी आणि माहितीसाठी सुरू केलेले रेल्वे पोलिसांचे ‘जीआरपी मुंबई’ हे ट्विटर खाते हॅक झाले आहे. हॅक झालेले ट्विटर अकाऊंट लवकरच पूर्ववत केले जाईल, असे रेल्वे पोलिसांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले.
मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलने लाखो प्रवासी प्रवास करत असतात. प्रवाशांच्या तक्रारी, त्यांच्या अडचणी आणि माहितीसाठी रेल्वे पोलिसांनी ‘जीआरपी मुंबई’ हे ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे. रेल्वे पोलिसांचे ‘जीआरपी मुंबई’ हे ट्विटर खाते हॅक झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी ‘सीपी जीआरपी’ या ट्विटर हॅण्डल अकाऊंटवरून ‘जीआरपी मुंबई’ हे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती प्रसिद्ध केली. पुढील माहिती येईपर्यंत या खात्यावरील कुठल्याही माहितीकडे लक्ष देऊ नका. खात्याचा ताबा परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तोपर्यंत आपल्या तक्रारी आणि प्रश्न हे सीपीजीआरपी मुंबई या ट्विटर अकाऊंट किंवा 1512 वर कळवू शकता, असे त्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.





























































