रेल्वेत जागेच्या वादातून कल्याणच्या तरुणाची हत्या

1734
murdered

रेल्वेगाडीत बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून 12 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मारहाण करणाऱयांमध्ये सहा महिलांचा देखील समावेश आहे. मुंबई-लातूर-बिदर एक्स्प्रेसमध्ये पुणे-दौंड या रेल्वे स्थानकांदरम्यान बुधवारी (दि. 12) रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

सागर मरकड (26, रा. कल्याण, जि. ठाणे) असे टोळक्याच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागरची पत्नी ज्योती हिने दौंड रेल्वे पोलिसांत फिर्याद दिली.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर हा सोलापूरमधील नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी बुधवारी (दि. 12) दुपारी पावणेएकच्या सुमारास पत्नी ज्योती, त्याची आई आणि 2 वर्षांच्या मुलीसह पुणे स्थानकाहून मुंबई-लातूर-बिदर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात बसले. यावेळी डब्यात प्रचंड गर्दी होती. त्यामुळे सागरने एका सीटवर बसलेल्या महिलेला जागा देण्यास सांगितले. त्यावर चिडलेल्या महिलेने त्याला शिवीगाळ केली. यावेळी तिच्यासोबत असलेल्या अन्य महिलांसह 6 पुरुषांनी सागरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. सागरच्या कुटुंबीयांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी दौंडपर्यंत सागरला मारहाण सुरूच ठेवली.

दौंड येथे एक्स्प्रेस पोहचताच या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सागरला येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून सर्व आरोपींना अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या