
पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आता प्रवाशांना पर्यावरणाला अनुकूल असे सौरऊर्जेवर चालणारे मोबाईल चार्जरचे पॉइंट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे विजेची बचत होणार असून प्रवाशांना आता रेल्वेस्थानकांवर बसल्या जागी आपल्या मोबाईलची बॅटरी फुल करता येणार आहे.
प्रवाशांना 24 तास संपूर्ण मोफतपणे मोबाईल चार्जिंग करता येणार आहे. एकावेळी एका सिंगल कियॉस्कद्वारे 8 फोन तर एका दिवसात 100 हून अधिक फोन चार्ज करता येऊ शकणार आहेत. हे कियॉस्क शंभर टक्के सौरऊर्जेवर चालणारे असून त्याचे सोलर पॅनल रेल्वे स्थानकांच्या छतावर बसविण्यात येणार आहेत. या कियॉस्कच्या निर्मितीसह बसविण्याचा खर्च एक लाख रुपये इतका आहे. परंतु ‘सीएसआर’ फंडातून पश्चिम रेल्वेला या कंपनीद्वारे हे मोबाईल चार्जिंग पॉइंट निःशुल्क उपलब्ध केले आहेत.
- मुंबईच्या चर्चगेट, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, दादर, सांताक्रुझ, अंधेरी (पश्चिम), कांदिवली (पश्चिम), बोरिवली (पश्चिम), बोरिवली पूर्व, वसई, नालासोपारा (पश्चिम), विरार, बोईसर आणि पालघर या पंधरा रेल्वे स्थानकांवर सोलर पावर कियॉस्क बसविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.































































