
रेल्वे तिकिट बुकिंग रॅकेट संपवण्यासाठी हिंदुस्थानी रेल्वे एक नवीन यंत्रणा घेऊन येत आहे. येत्या काळात रेल्वे तिकिटे बुक करण्यासाठी तुमचे आधार कार्ड पॅनकार्डशी जोडणे आवश्यक असणार आहे. असे न केल्यास आयआरसीटीसी तुमचे तिकीट बुक करणार नाही. याशिवाय आयआरसीटीसी तुम्हाला पासपोर्ट व इतर ओळखपत्रांची माहितीदेखील विचारू शकते. ही सर्व तपासणी आयआरसीटीसी वेबसाइटवर केली जाईल. रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
अरुण कुमार यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे की, यापूर्वी दलालांना रोखण्यासाठी जे काही पाऊल उचलले गेले त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जात नव्हती. यामुळेही तिकिट बुकिंग रॅकेट जोरात सुरु होते. आता दलालांना रोखण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले की, आम्हाला सर्वात आधी एक नेटवर्क तयार करण्याची आवश्यकता आहे, भविष्यासाठी ही आमची योजना आहे. आम्ही जवळजवळ आधार प्राधिकरणाचे आमचे काम पूर्ण केले आहे. इतर विभागात देखी ही प्रक्रिया सुरु आहे. लवकर संपूर्ण यंत्रणा काम करण्यास तयार होईल, यानंतर आम्ही या तंत्रज्ञानाचा उपयोग सुरु करू.



























































