
देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हिंदुस्थानी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 28, 29, 30 आणि 31 मार्चला राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमधील अनेक भागांत अवकाळी पाऊस बरसणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या चार दिवसांत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील, असेही हवामान खात्याने वर्तवले आहे.
उत्तर पश्चिम भारतातसुद्धा अवकाळी पाऊस पडेल. यामुळे 28 ते 31 मार्च यादरम्यान राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमधील अनेक भागांत मोठा पाऊस पडेल. विजांचा कडकडाट, 30 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील, असा अलर्ट जारी केला आहे. दक्षिण भारतातसुद्धा अवकाळी पाऊस पडेल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पुद्दुचेरी, माहे, कराईकल आणि यनममध्ये 28 ते 31 या चार दिवसांत पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. यादरम्यान, 30 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल, असेही म्हटले आहे. पश्चिम भारतातही अवकाळी पाऊस होईल. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, सौराष्ट्र, कच्छ आणि गुजरातमध्ये पाऊस होईल.




























































