
गेल्या २४ तासांपासून वादळी पाऊस आणि गारपिटीने अमरावती जिल्ह्याला झोडपले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आगामी दोन दिवसांत पुन्हा गारपिट व पाऊस येणार असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
मोर्शी व चांदुरबाजार तालुक्यात तुफान गारपीट झाल्याने शेतकर्यांना फटका बसला आहे. मोर्शी तालुक्यातील विचोरी, तळेगाव व चांदुरबाजार तालुक्यातील शिराळा, पुसदा, राजुरा या गावात मोठ्या प्रमाणावर गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे गारपिटीने संत्र्याचा बहार गळला तसेच तूर, हरभरा, भाजीपाला यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. मोर्शी, भातुकली व अमरावती तालुक्यांतील एका पट्ट्यात येणार्या काही भागांत शनिवारी दुपारच्या वेळी वादळी पावसासह गारपीट झाली. ही गार बोराएवढी होती. यामुळे शेती पिकांचे बरेच नुकसान झाले आहे. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छपराचे वादळामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हे छप्पर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोर्शी तालुक्यात असलेल्या नेरपिंगळाई परिसरात काल दुपारी 3च्या सुमारास अवकाळी पावसासह गारपिटीला सुरुवात झाली. तिवसा ते चांदूर बाजार रस्त्यावर असलेल्या अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे जमीनदोस्त झाली आहेत. वार्याचा वेग भयानक असल्यामुळे अनेकांच्या घरावरील टिनाचे शेड उडाले असून त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. जिल्हा परिषद शाळेचे छप्पर पूर्णपणे उखडले आहे. सुदैवाने काल झालेल्या वादळी पाऊस गारपिटीमुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. अनेकांच्या शेतातील तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

























































