
यंदाची दिवाळी पावसाच्या सावटाखाली असून आठ दिवसांपासून नगर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे.जिल्ह्यात 1 जून ते 25 ऑगस्ट या काळात सरासरी 742 मिलिमीटर पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात यंदा दिडपट पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या काळात सरासरी 497 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र 25 ऑक्टोबरपूर्वीच सरासरीपेक्षा तब्बल 245 मिलिमीटर पाऊस जास्त पडला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली असून सर्वच ओढे, नाले यंदा भरून वाहत आहेत.
गेल्या वर्षी जिल्ह्यात केवळ सरासरी 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. अल्प पावसामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला होता. यंदा मात्र पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. 25 ऑक्टोबरपर्यंतच जिल्ह्यात सरासरी 149 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वांत जास्त पाऊस अकोले तालुक्यात झाला. अकोल्यात सरासरी 301 टक्के पाऊस झाला आहे, तर सर्वांत कमी पाऊस जामखेड तालुक्यात झाला असून, या तालुक्यांत आतापर्यंत झालेला पाऊस सरासरी 100 टक्के आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गेल्या सात दिवसांपासून सातत्याने पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे पावसाची सरासरी वेगाने वाढत असून, यंदा गेल्या चार ते पाच वर्षांमधील रेकॉर्डब्रेक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरात पावसाची शक्यता धरुनच दिवाळी साजरा करण्याची वेळ आली आहे.
यंदा पाऊस जोरात असल्याने दिडपट पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदा ओढे, नाले, नद्या, बंधारे यांमध्ये चांगलेच पाणी जमा झाले आहे.जिल्हयातील अनेक ठिकाणी या पावसाच्या जोराने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. महामार्गावर देखील मोठ मोठे खड्डे पडल्याने लहान मोठे अपघात होत आहेत. ग्रामीण भागात हातातोंडाशी आलेली पीके उन्मळून पडली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच आता वेधशाळेने पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.


























































