विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या दुहेरी पट्ट्यामुळे नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाळी वातावरण आणखी तीन-चार दिवस कायम राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. यवतमाळ जिल्हयातील आर्णी,घाटंजी, वणी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शनिवारी सायंकाळी काही भागांत पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्यानंतर रविवारी सकाळीही अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पहाटे चारच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळी आठपर्यंत होता. ढगाळ वातावरणामुळे दिवसभर हवेत गारठा जाणवला. पावसाळी वातावरण आणि रविवार असल्यामुळे अंबाझरी, महाराजबागसह अनेक बगीच्यांमध्ये दिवसभर गर्दी पाहायला मिळाली. गारठ्यामुळे कमाल तापमानात अडीच अंशांची घट होऊन पारा 26.8 अंशांवर स्थिरावला. पावसाळी वातावरण येत्या 13 डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे. यादरम्यान नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचीही शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.