मुंबई, ठाण्यात तीन दिवस मुसळधार; रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्यासाठी रेड अलर्ट

पावसाने मुंबईसह उपनगरात आज काहीशी विश्रांती घेतली. मात्र पुढचे तीन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे, तर रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्यासाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर दिसून येत आहे. दुसरीकडे नागपुरात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात येत्या 24 तासांत चक्रीय वाऱ्यांचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे चार दिवस नागरिकांनी सतर्प राहण्याचे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

वारे ताशी 50 किमी वेगाने वाहणार

मुंबई, ठाण्यासह उपनगरात पुढील 48 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वारे ताशी 40 ते 50 किमी वेगाने वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.