मालवण शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबले; जनता त्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण शहारात गटारांसह, नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने मुसळधार पावसात शहरातील अनेक भागात पाणी तुंबले आहे. मेढा, कोथेवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. पावसाचे पाणी वस्तीत घुसल्याने मेढा, कोथेवाड्यातील काही घरांना धोका निर्माण झाला आहे. पाणी तुंबल्याने जनतेचे हाल होत असल्याने योग्य साफसफाई झाली नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पालिका प्रशासनाने तत्काळ गटार, नाल्यांची साफसफाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी शहरातील गटार, नाल्यांची साफसफाई केली जात होती. मात्र यावर्षी पावसाळा सुरू झाला तरी काही ठिकाणच्या नाले वगळता अन्य ठिकाणच्या गटारांची, नाल्यांची साफसफाई झाली नाही. परिणामी गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मेढा, कोथेवाडा भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबले आहे. यात नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने पावसाचे पाणी वस्तीत घुसल्याने येथील घरांना धोका निर्माण झाला आहे.

मेढा येथील मौनीनाथ मंदिर, दोन पिंपळ, कोथेवाडा येथील गटारात मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा तसेच नाल्यांची साफसफाई झाली नसल्याबाबत सात दिवसांपूर्वी पालिका प्रशासनास छायाचित्रे पाठवून लक्ष वेधत तत्काळ गटार व नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यानेच मेढा, कोथेवाडा भागात पाणी तुंबले असून काही घरांना धोका निर्माण झाला आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यास अनेक घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तत्काळ या भागातील गटार, व्हाळ्यांची साफसफाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.