25 ते 28 मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भात पाऊस आणि गारपिटीचा इशारा

5301

राज्यातील हवामान हे अत्यंत विचित्र बनत चाललं असून एकीकडे तीव्र उन्हाळा आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीट असं चित्र राज्यामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी म्हणजे 25 तारखेला विदर्भामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. गुरुवार आणि शुक्रवारी या तीनही भागांमध्ये गडगडासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

एकीकडे संपूर्ण देशभरात आणि खासकरून महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या फैलावामुळे वातावरण चिंतेचं बनलेलं असतानाच या वातावरण बदलाने आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडणार आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या तापमान वाढायला सुरुवात झाली असून विदर्भातील अकोल्यामध्ये 40 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान पोहोचले आहे. राज्याच्या बहुतांश भागामध्ये तापमानाने सरासरी तापमानाचा आकडा ओलांडल्याने नागरिकांना घाम फुटायला लागला आहे.

मंगळवारी नगर जिल्ह्यातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला होता. पुण्यातील सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. संभाजीनगर, बीड आणि जालन्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाले होते.

शेजारी राज्य असलेल्या गोव्यामध्ये बुधवारी सकाळी पाऊस पडला. हवामान खात्याने बुधवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता, तो खरा ठरला आहे. गोव्यातील हवामान खात्याने उत्तर आणि दक्षिण गोव्यात पुढील 3 तासांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला होता. बार्देश,सासष्टि, मुरगाव,फोंडा आणि डिचोली तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. 

आपली प्रतिक्रिया द्या