भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर पुन्हा वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात दोन दिवसांपूर्वी पावसाचा जोर ओसरल्याने धरणाकडे येणारा पाण्याचा ओघ मंदावला होता. मात्र, गुरुवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा वाढल्याने शेतकऱयांना हायसे वाटले आहे. दरम्यान, मुंबईत जोरदार पाऊस होत असल्याने भंडारदरा आणि मुळा पाणलोटात आज-उद्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 11 हजार 39 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी 2458 दलघफू (22.27 टक्के) पाणीसाठा झाला होता.

पाणलोटात मान्सून दाखल झाला, तेव्हापासून पाऊस अद्यापि टिकून आहे. त्यामुळे 12 दिवसांत भंडारदरा धरणात नव्याने 200 दलघफू पाणी दाखल झाले आहे. पाऊस कमी झाल्याने डोंगरदऱयांतून गायब झालेले धबधबेही कालच्या पावसामुळे आता पुन्हा वाहू लागले आहेत. कोरडे पडलेले ओढे-नाले पुन्हा खळखळू लागले आहेत. गेल्या 24 तासांत भंडारदरात 9, घाटघर 40, पांजरे 21, रतनवाडी 17, तर वाकी येथे 5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान पावसाला सुरूवात झाल्यामुळे भातलावणीलाही लवकरच सुरूवात होणार आहे.

कुकडी प्रकल्पात 98 दलघफू नवीन पाणी दाखल

 दक्षिण नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुकडी प्रकल्पाच्या पाणलोटात पाऊस कमी झाला असला, तरी अजूनही ओढे-नाले वाहत असल्याने धरणांत मंद गतीने पाण्याची आवक होत आहे. 24 तासांत 98 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. या धरणांतील एकूण पाणीसाठा 1711 दलघफू झाला होता. यंदा खूपच कमी पाणीसाठा आहे. कारण गतवर्षी याच काळात या समूहात 5173 दलघफू पाणी होते.