हा देवाचा इशारा! रजनीकांत यांची राजकारणातून माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वीच स्वत:चा राजकीय पक्ष काढण्याचा निर्धार बोलून दाखवणारे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणातून माघार घेतली आहे. माफ करा, आजारपणामुळे मी राजकारणात येणार नाही व पक्षही काढणार नाही. गेल्या काही दिवसांत तब्येत खूप खालावत चाललीय. हा देवाचा इशारा आहे, असे त्यांनी मंगळवारी जाहीर केले.

आजारपणाने खूप काही शिकवलेय. तब्येत ठिक नसताना राजकारणात येण्याचे धाडस मला दाखवायचे नाहीय. समर्थकांनाही नाराज करण्याची इच्छा नाही. माझ्या निर्णयाने समर्थक नाराज होतील, परंतु मला माफ करा, अशी भावना रजनीकांत यांनी व्यक्त केली. मला बळीचा बकरा बनवला गेल्याचाही अर्थ लोकांनी काढू नये, असेही ते म्हणाले. त्यांच्या राजकीय प्रवेशाची समर्थक जवळपास 20 वर्षांपासून प्रतिक्षा करीत होते. पुढील वर्षी होणाऱया तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला ते नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार होते. तत्पूर्वीच तब्येतीच्या कारणावरून त्यांनी राजकारणात न येण्याचा निर्णय जाहीर केल्याने समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. रक्तदाबाचा त्रास व थकवा आल्यामुळे त्यांना 25 डिसेंबरला हैदराबादच्या रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज दिला.

कमल हासन निर्णयावर नाराज

रजनीकांत यांचा निर्णय ऐकून अभिनेता कमल हासन हे देखील निराश झाले. निवडणूक प्रचार झाल्यानंतर रजनीकांत यांची भेट घेईन. रजनीकांत यांच्या चाहत्यांप्रमाणेच मीही निराश झालो आहे, परंतु त्यांची तब्येत महत्त्वाची आहे, असे कमल हासन म्हणाले. रजनीकांत यांनी गेल्या वर्षी राज्यातील जनतेच्या हितासाठी कमल हासन यांच्याशी युती करणार असल्याचे जाहीर केले होते.