खराब कामगिरीमुळे स्टीव्ह स्मिथला संघातून डच्चू

इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेचा पहिला हंगाम जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्सने कर्णधआर स्टीव्ह स्मिथला रिलीज केले आहे. खराब कामगिरीमुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सचे आणि स्मिथची कामगिरी देखील सुमार राहिली होती, त्यामुळे टीम मॅनेजमेंटने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला.

‘एएनआय’ने दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीएल हंगामासाठी प्रत्येक संघ मालकांना कोणत्या खेळाडूंना रिलीज करणार आहेत याबाबत बीसीसीआयला एक यादी सोपवायची होती. आज याचा शेवटचा दिवस होता. राजस्थान रॉयल्सच्या टीम मॅनेजमेंटने सखोल चर्चा केल्यानंतर स्मिथला डच्चू दिला.

स्टीव्ह स्मिथला आंतरराष्ट्रीय सामन्यांना मोठा अनुभव होता, मात्र राजस्थान रॉयल्ससाठी तो विशेष योगदान देऊ शकला नाही. स्मिथला रिलीज केल्यानंतर आता राजस्थानच्या संघाकडे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स असून त्याला कर्णधार केले जाईल अशी शक्यता आहे. संघाला नवीन कर्णधारासह खेळण्याची गरज आहे, असे माजी खेळाडू आकाश चोप्रा यांनीही याआधी म्हटले होते.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडे स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन सारखे दिग्गज खेळाडू असताना गेल्या काही हंगामात संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे संघाला स्मिथला बाहेरचा रस्ता दाखवणे हिताचे वाटले.

दरम्यान, आयपीएलसाठी यंदा मोठा लिलाव होणार नाही. कोरोना महामारीमुळे आधीच अनेक बंधने आल्याने यंदा मिनी ऑक्शनची योजना बीसीसीआयने आखली असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा मिनी ऑक्शन होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या