आपला माणूस : प्रणितची अवकाशभरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>राजेश भोस्तेकर<<

[email protected]

लहानपणापासूनच त्याच्या मनात काहीतरी वेगळे करण्याची जिद्द होती. सतत आकाशाकडे एकटक डोळे लावून बसणारा अलिबागकर प्रणित पाटीलने आपले हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तितकीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि तो आता अवकाशभरारी घ्यायला सज्ज झाला आहे. हिंदुस्थानच्या या थोर सुपुत्राची नासाच्या खडतर अशा मंगळ मोहिमेवर कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. अंतराळ कवेत घेणारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सध्या नासात आव्हानात्मक प्रशिक्षण दिले जात असून मंगळसदृश वातावरणच येथे तयार करण्यात आले आहे. प्रणितचे हे यश म्हणजे अवघ्या रायगडकरांसाठी अभिमानाची ‘झेप’ ठरली आहे.

अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर हे प्रणितचे गाव. 27 जून 1989 मध्ये अलिबाग तालुक्यातील मेढेखार या छोटय़ा गावात आजोळीच त्याचा जन्म झाला. प्रणितचे वडील गजानन पाटील पोलीस असल्याने वडिलांच्या बदलीमुळे सतत भटकंती. 1991 मध्ये जुने पनवेलमध्ये आल्यावर प्रणितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या व्ही. के. हायस्कूलमध्ये झाले. 2009 मध्ये कामोठेतील एमजीएम कॉलेजमध्ये आयटी इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच अंतराळ व त्या संबंधातील विविध गोष्टींची त्याला आवड होती. मात्र आयटी शिकत असताना इतर माहिती नव्हती. 2010 मध्ये घाटकोपर येथील ऍसेंचर कंपनीत असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून नोकरीला लागलेला प्रणित नऊ महिन्यांत अमेरिकन अलायन्स या कंपनीत आयटी स्पेशालिस्ट म्हणून रुजू झाला. ही कंपनी नासा एन्सापयर सिस्टममध्ये सिलिका सप्लाय करते. ही कंपनी नासाची एक वेंडर होती. प्रणित त्याच्यासाठी प्रपोजल मॅनेजमेंट करू लागला.

अमेरिकन अलायन्ससोबत काम करत असताना अंतराळाबद्दल असलेली आवड अधिक चांगल्या प्रकारे जोपासता आली. त्यांच्याकडून इंटरनेटच्या माध्यमातून विविध माहिती मिळू लागली. नासा एडिअस जनरल रिडिंगची आवड, रिसर्च पेपर वाचन केले. नासाचे पॉकर पॉइंट अभ्यासले. मग अंतराळाबद्दल शास्त्राrय माहिती घेण्यासाठी ऑक्टोबर 2014 मध्ये एज्युकेशन व्हिसा घेऊन अमेरिकेतील अंतराळ संशोधनात अग्रस्थानी असलेल्या ‘एम्री रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटी’मध्ये त्याने प्रवेश मिळविला. इतकेच नाही तर नोकरी सांभाळताना पुढील शिक्षण घेतले. सप्टेंबर 2016 मध्ये थ्री कन्टिन्युइंग एज्युकेशन युनिट (सीईयूस) इन सबऑर्बिटल मिशन सिम्युलेशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पूर्ण केली. यासाठी त्याला साडेपाच हजार अमेरिकन डॉलर खर्च आला. त्यानंतर नासाच्या ‘फ्लाइट अपॉर्च्युनिटीज (opportunities) प्रोग्रॅम’च्या प्रोजेक्ट पोसम (Possum) मध्ये त्याची थोडक्यात निवड हुकली. तिसऱ्या वेळी म्हणजे 2016 मध्ये 1602 बॅचमध्ये सायंटिस्ट अस्ट्रेनॉट कँडिडेट या पदासाठी प्रणितची निवड झाली.

प्रणितने जगविख्यात पायलट पॅटी वागस्टाफ यांच्याकडून एरोबॅटिक्स प्रशिक्षण घेतले आहे. तसेच ‘साऊदर्न एरोमेडिकल (Southern Aero Medical) इन्स्टिटय़ूट’मधून डॉ. पॉल बुझा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऍडव्हान्स चेंबरप्रोग्राम’देखील पूर्ण केला आहे.

‘स्विस स्पेस सेंटर’ आणि ‘ईपीएफएल’ (EPFL) मधून स्पेस मिशन डिझाईन आणि ऑपरेशन कोर्स (operation course) पूर्ण केला आहे. सोबतच तो नासा स्पेस सेंटरचे ‘फिजिकल सायन्स इन्फॉरमॅटिक सिस्टम’मध्ये (physical science informatics) ‘ऍनालिटिकल युजर’ (analytical user) म्हणून कार्यरत आहे.

पनवेल येथील त्याच्या घरी निवृत्त पोलीस असलेले त्याचे वडील गजानन पाटील, आई शोभना पाटील, भाऊ प्रतीक पाटील (एलएलबी करतो) राहतात. पत्नी अमृता व दोन वर्षांच्या श्रीणा या मुलीसोबत प्रणित अमेरिकेत राहतो. या वाटचालीत वडिलांना आदर्श मानणाऱ्या प्रणितला डॉ. राजेंद्र पाटील यांनी नेहमीच नासाच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले.

मंगळावर मायनस 20 डिग्री तापमान असते. त्यामुळे शास्त्रज्ञांना या वातावरणात आपली मोहीम फत्ते करता यावी यासाठी खास नासामध्ये मंगळसदृश वातावरण तयार करण्यात आले आहे. सतत सुटणारे लाल वादळ, 1/3 गुरुत्व बल, फक्त एनर्जिटिक पावडर खातानाच मंगळावरच्या वातावरणाचा शरीरावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून अंगाला जेली लावून अंग पुसायचे, नवीन बीजारोपण करण्यासाठी तेथील संयुगे एकत्र करून प्रयोग करायचे असे एक ना अनेक प्रशिक्षण सध्या प्रणित आणि त्याच्या टीमला दिले जात आहे.