कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्येप्रकरणी, मुख्य आरोपी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपीला वाकड पोलिसांनी गुरुवारी गजाआड केले. राकेश सत्यनारायण मौर्य (वय 47, रा. कांदिवली पूर्व, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी सोनाली राजेश साप्ते (वय 45, रा. ताथवडे. सध्या रा. कांदिवली पश्चिम, मुंबई) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार तीन वर्षांपासून 2 जुलै 2021 या कालावधीत राजेश साप्ते यांच्या कांदिवली पश्चिम, मुंबई आणि ताथवडे, पुणे येथील घरी घडला.

कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांनी 3 जुलै रोजी ताथवडे येथील त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी राकेश मौर्य हा पसार होता. पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी परिसरातील एका हॉटेलमध्ये राकेश मौर्य आला असता त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली असून एकूण 9 आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. राकेश मौर्य हा संबंधित हॉटेलमध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासंदर्भात वकिलाशी बोलणी करण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.