
चीनसह अन्य काही युरोपियन देशांत अद्यापही कोरोनाची चौथी लाट पाहता मास्कमुक्तीचा विचार करता येऊ शकत नाही. ज्यावेळी तशी परिस्थिती वाटेल तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच याबाबतचा निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
जगातील इतर देशांत अद्यापही कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. हे पाहता मास्कमुक्तीचा निर्णय आता तरी घेता येऊ शकत नाही.आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातो तेव्हा स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्याही सुरक्षेसाठी मास्क आवश्यक आहे. ज्यावेळी परिस्थिती बदलेल तेव्हा मास्कमुक्तीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावरच घेण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. इतर निर्बंधांबाबत सरकारकडे वेगवेगळय़ा मागण्या येत असतात. रेल्वे, मॉल्स व इतर बाबतच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. टास्क फोर्सशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे टोपे म्हणाले. देशात आणि जगात काय घडामोडी घडत आहेत याकडे टास्क फोर्सचे लक्ष असते. त्यानुसार कोणत्या गोष्टी करायला हव्यात याचा निर्णय टास्क फोर्स घेते असेही त्यांनी स्पष्ट केले.
n लसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. त्यात ढिलाई करून चालणार नाही. लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीनेच पावले उचलण्यात येत असल्याचेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.



























































