सीमा ओलांडून याल तर खैर नाही – राजनाथ सिंह

195

कलम 370 आणि 35 अ या कारणांमुळेच कश्मीर खोऱ्यात हिंसाचार आणि दहशतवाद वाढला होता. पण केंद्र सरकारने आपले धोरण अजूनही नरम केलेले नाही. सीमा ओलांडून आत याल तर परत जाऊ शकणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला ठणकावले.

कश्मीर खोऱ्यातून कलम 370 हटविल्यावरून केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य करणाऱ्यांना राजनाथ सिंह यांनी रविवारी सडेतोड जवाब दिला. ते म्हणाले की, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान पाकव्याप्त कश्मीरमध्ये गेले तेव्हा आपल्या लोकांना ते म्हणाले, हिंदुस्थान-पाकिस्तानच्या सीमेजवळ जाऊ नका. पण मी म्हणतो, घुसखोरांनी सीमा ओलांडून येऊन दाखवावे. येथे आलात की तुमची खैर नाही. कलम 370 हे कर्करोगासारखे होते. या कलमाने कश्मीरमध्ये मोठा हिंसाचार घडवला. याच 370 कलमाचा प्रभाव काढून टाकण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरे करून दाखवले. कश्मीरमधील तीनचतुर्थांश नागरीकांना हे कलम हटवले जावे असेच वाटत होते, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

1965 वा 1971 सारखी चूक पुन्हा करू नका!

हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा प्रयत्नही करू नका. 1965 आणि 1971 सारखी चूक पुन्हा कराल तर ते पुन्हा पाकिस्तानात परत जाऊ शकणार नाहीत. यावरून पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱयांचे कंबरडे मोडून काढले जाईल, असेही राजनाथ सिंह यांनी पाकडय़ांना सुचविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या