भाजपची उतरती कळा सुरू झाली, राजू शेट्टी यांची फटकेबाजी

1263

केंद्रातील भाजप सरकारने हिंदुस्थानला भ्रष्टाचारमुक्त करून दाखवू, असे आश्वासन दिले. विकासाची स्वप्नेही दाखवली पण प्रत्यक्षात जातीपातींमध्ये भांडणे व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जनतेने तुम्हाला मतदान केले होते का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. राज्यात जिल्हा परिषद निकालामुळे भाजपला उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली असून मतदारांनी भाजपला साफ नाकारले असल्याची फटकेबाजीही त्यांनी केली.

जागतिक मराठी अकादमीच्या ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनासाठी राजू शेट्टी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत केंद्र सरकार व भाजप नेत्यांवर टिकास्त्र्ा सोडले. राज्यात जिल्हा परिषद निकालानंतर भाजपला नाकारण्यास जनतेने सुरुवात केली आहे. त्यावर भाष्य करताना ते म्हणाले, भाजप हा भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्थान आणि विकासाच्या मुद्यावर लोकसभा निवडणुकीत विजयी झाला. मात्र भाजपने जनतेची पूर्णतः फसवणूक केली आहे. विकासाची स्वप्ने जनतेला दिली असली तरी ती पूर्ण करण्यात भाजप हा अपयशी ठरला आहे.

मोदींना कानपिचक्या; जगभर फिरण्यापेक्षा सॅटेलाईटवर खर्च करा!
राजू शेट्टी यांची संमेलनात मुलाखत घेण्यात आली. शेतकऱ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान जगभर फिरत आहेत. परदेशातसुद्धा नैसर्गिक आपत्ती येत असते मात्र त्याची तंत्रज्ञानामुळे परदेशी प्रशासनाला आधीच कळते. त्यामुळे होणारे नुकसान टाळता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभर फिरून पैसे खर्च करण्यापेक्षा हवामानाबाबत माहिती देणाऱ्या सॅटेलाईटच्या तंत्रावर खर्च केल्यास येथील शेतकऱ्यांनाही नैसर्गिक संकटाची माहिती मिळण्यास मदत मिळेल. केंद्र सरकारच्या या उधळपट्टीवरदेखील त्यांनी परखड मत व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या