
>> राकेश दळवी
पूर्वी लोक पाटा, वरवंटा घेऊन जेवणासाठी लागणारा कच्चे पदार्थ मिश्रण करून मसाला बनवित. विजेवर चालणाऱया मिक्सरचा शोध लागला आणि पाटा, वरवंटय़ाचा वापर कमी झाला.
परदेशात एखाद्या गोष्टीची कल्पना सुचली की, त्याचे लगेच पेटंट घेऊन ठेवतात. त्याप्रमाणे मिक्सरसाठी लागणाऱया गोल फिरणाऱया मशीनचा शोध लागला. तेव्हाचे त्याचे पेटंट बाल्टिमोर यांनी 1856 मध्ये घेऊन ठेवले. त्यानंतर तशा पद्धतीच्या मोठय़ा काही सुधारणा करून अमेरिकेच्या रफ्स ईस्टमन यांनी मिक्सरसाठी लागणाऱया इलेक्ट्रिक मोटरचा शोध 1885 मध्ये लावला. मिक्सरमध्ये अनेक प्रकार असतात, आकार असतात. आता जसा मिक्सर वापरला जातो तो हर्बर्ट जान्सन याने 1908 मध्ये बनविला.
पूर्वी हिंदुस्थानात सुमीत मिक्सर हा एकमेव लोकप्रिय मिक्सर होता. 1963 साली तो हिंदुस्थानात सुरू झाला. 1980 च्या दशकात महिन्याला 50 हजार विकले जात. सत्यप्रकाश माथूर यांच्याकडे विदेशी कंपनीचा मिक्सर, ग्राइंडर होता. तो बिघडला आणि दुरुस्त होईना. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांच्याकडे बिघडला तरी दुरुस्त होईल असा हिंदुस्थानी मिक्सर बनविण्याचा आग्रह धरला. परदेशी मिक्सर हिंदुस्थानी अन्नपदार्थांसाठी तितके उपयोगी नव्हते. म्हणून कितीही पदार्थ मिक्स करता येतील असा मजबूत मिक्सर सत्यप्रकाश माथूर यांनी बनविला. सुमीत म्हणजे चांगला मित्र. कित्येक वर्षे तो महिलांना जेवण करताना साथ देतो आहे. हिंदुस्थानी उद्योजकही किती दर्जेदार उत्पादने बनवू शकतात त्याचे हे उदाहरण आहे.





























































