कुणालाही मत द्या, पण भाजपाला देऊ नका! बंगाली राजकारणात शेतकरी आंदोलनाची एण्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असे राजकारण तापू लागले आहे. त्यातच आता कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांनी बंगालच्या राजकारणात एण्ट्री केली आहे. कुणालाही मत द्या, पण भाजपला देऊ नका, असे आवाहनच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कोलकाता येथे किसान महापंचायत घेऊन केले आहे.

कोलकाता येथील भवानीपोरा येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतीत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱया शेतकऱयांना भेटायला यांना वेळ नाही. भाजप सरकारचे सर्व नेते आणि मंत्री पश्चिम बंगालच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. त्यामुळे आम्हीही त्यांच्यापाठोपाठ येथे पोहचलो आहोत. ते मतांसाठी फिरताहेत, पण आम्ही शेतकरीविरोधी भाजपला मत देऊ नका, असे सांगायला आलो आहोत, असे टिकैत म्हणाले.

शेतकरीविरोधी भाजपला धडा शिकवा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने निवडणुकीत भाजपवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. किसान मोर्चाचे नेते योगेंद्र यादव यांनी या निवडणुकीत कुणाला मत द्या हे सांगण्यापेक्षा शेतकरीविरोधी भाजपला धडा शिकवा हेच आपले ध्येय्य असल्याचे म्हटले आहे.

मोदी जिथे जातील तिथे किसान महापंचायत

कृषी कायदे मागे घेईपर्यंत विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या ठिकाणी सभा व रॅली करतील त्या ठिकाणी किसान महापंचायतीचे आयोजन करून कृषी कायद्याच्या विरोधात जनजागृती केली जाईल, असे राकेश टिकैत म्हणाले. रविवार, 14 मार्चला सिंगूर आणि आसनसोल येथे महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.

ममतांवर हल्ला झाल्याचे पुरावे नाहीत

ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचा अहवाल विवेक दुबे आणि अजय नायक या निरीक्षकांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. ज्यावेळी ममता यांच्या पायाला दुखापत झाली त्यावेळी तेथे मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता, असे या अहवालात म्हटल्याचे सांगितले जाते. बुधवारी चार-पाच लोकांनी आपल्यावर हल्ला केला असा दावा पायाला झालेल्या दुखापतीनंतर ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन निरीक्षकांची चौकशीसाठी नियुक्ती केली होती.