
सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अयोध्येत राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंदिरासाठी केंद्र सरकारने ट्रस्टही नियुक्त केला आहे. तशातच आता नऊ मुस्लिम नागरिकांनी राममंदिर ट्रस्टला लिहिलेल्या पत्रात रामलल्लाच्या 37 एकर जमिनीपैकी पाच एकर जमिनीवर 1895च्या लढय़ातील मुस्लिम शहीदांच्या कबरी असल्याचा दावा केला आणि प्रभू रामचंद्राचे पवित्र मंदिर अशा कब्रस्तानावर बांधू नका असे आवाहन केले आहे. या दाव्यानंतर रामलल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास यांनी या जागेत ऋषी, मुनी आणि संतांच्या समाध्या असतील. आता कबरीच्या नावाने अटकाव कशाला असा सवाल केला. शिवाय पवित्र शंखाच्या नादस्वराने आणि शंखातील जलाभिषेकाने स्मशान असो अथवा कब्रस्तान सारे काही शुद्ध व पवित्र होते असा दावा केला.
अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार आहे. काल मंगळवारी अयोध्येतील मुस्लिम नागरिकांनी राममंदिर ट्रस्टला पत्र लिहून राममंदिरासाठी हस्तांतरित केलेल्या 37 एकरांपैकी पाच एकर जागेत मुस्लिम योद्धय़ांचे कब्रस्तान आहे. या कब्रस्तानावर प्रभू रामचंद्रांच्या पवित्र मंदिराचा पाया कसा उभारणार असा सवाल केला होता. त्यावर रामलल्लाच्या पुजाऱयांनी तीक्र नापसंती व्यक्त केली.
लढा ऋषी-मुनी, संतांनी दिलाय, कब्रस्तान कुठून आले – विहिंप
अयोध्येतील राममंदिर निर्माणाच्या कामात आता कुठलीही बाधा टिकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने निराश व हताश झालेले लोक आता नवनव्या शंका काढून मंदिर निर्माणाच्या कामात अडथळे आणत आहेत. इतिहासात आणि वैदिक काळात अयोध्येतील राममंदिराच्या रक्षणासाठी आमच्या ऋषी, मुनी व संतांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली आहे. त्यांच्या समाध्या या ठिकाणी असायला हव्यात. मग अयोध्येतील या जागेत कब्रस्तान आले कुठून, असा सवाल विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी केला आहे.
पवित्र शंखध्वनीने सर्व काही पवित्र होते!
भगवान विष्णूंच्या प्रिय शंखाच्या ध्वनीने आणि शंखातील जलाभिषेकाने स्मशान असो अथवा कब्रस्तान सारे काही शुद्ध होते. त्यामुळे अशा ‘अडंग्या’ शंकांनी भगवान रामाच्या मंदिराचे काम आता थांबणार नाही, असे परखड स्पष्टीकरण ‘रामलल्ला’चे मुख्य पुजारी महंत आचार्य सतेंद्र दास यांनी केले आहे.


























































