जय श्रीराम! अयोध्येतील राम मंदिराचे 5 ऑगस्टला भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ram-mandir

प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मुहूर्त अखेर ठरला. मंदिराच्या भूमिपूजनासाठी 5 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. काशी येथील ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंदिराचा शिलान्यास होणार आहे.

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची शनिवारी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांच्यासह 12 सदस्य सामील होते. तीन सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी पंतप्रधानांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण याआधीच पाठवले होते. शनिवारी राम मंदिर ट्रस्टकडून 3 किंवा 5 ऑगस्टच्या तारखेचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाकडून 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

  • तीन मजल्यांवर प्रत्येकी 106 खांब
  • 14 फूट आणि 6 इंचाचा एक खांब असून त्यामध्ये 16 मूर्ती कोरल्या जाणार आहेत.
  • 268 फूट लांब आणि 140 फूट रुंद असे मंदिर राहणार आहे.

असा असेल भूमिपूजन सोहळा

भूमिपूजनासंबंधित कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासूनच सुरू होणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनाचे सर्व विधी काशी येथील ब्राह्मण पार पाडणार असून पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मंदिराचा शिलान्यास होणार आहे.
राम मंदिर निर्माण साडेतीन वर्षांत

पावसाळ्यानंतर मंदिर निर्माणाच्या कार्याला सुरुवात होईल. मंदिर निर्मितीच्या निधीसाठी 10 कोटी कुटुंबांकडे आर्थिक सहाय्यासाठी संपर्क केला जाणार आहे. मंदिर निर्मितीचा आराखडा तसेच निधी संकलन झाल्यानंतर साडेतीन वर्षांत या मंदिराची निर्मिती पूर्ण होईल असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले.

शिवसेनेची आग्रही भूमिका

मंदिर निर्मितीसाठी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांनी 24 नोव्हेंबर 2018 रोजी अयोध्या दौरा करीत ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ अशी आग्रही भूमिका मांडली होती. 16 जून 2019 रोजी 18 खासदारांसह अयोध्या दौरा करीत उद्धव ठाकरे यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. महाविकास आघाडीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर 7 मार्च 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा करीत रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर निर्मितीसाठी त्यांनी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या देणगीची घोषणाही केली होती.

मंदिर 318 खांबांवर उभे राहणार

रामलल्लाचे मंदिर 120 एकर जागेत उभे राहणार असून 161 फूट उंचीचे 5 घुमटांसह 318 खांबांवर उभे राहणारे हे जगातील पहिले मंदिर असणार आहे, असे राम मंदिराचा आराखडा तयार करणारे वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनी सांगितले.