
अक्षय कुमार अभिनित राम सेतु या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. नुकतंच त्याचं पोस्टर व्हायरल करण्यात आलं असून त्याच्या या पोस्टरवरून ट्रोलिंग सुरू झालं आहे. कारण, या पोस्टरमध्ये एक चूक आढळली आहे.
अक्षय कुमारने त्याच्या ट्विटरवरून एक पोस्ट टाकली असून त्यात राम सेतु या त्याच्या चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटाबाबत बऱ्याच चर्चा होत असल्यामुळे ते काही अवधीतच व्हायरल झालं. पण, त्या पोस्टरमध्ये एक चूक होती, जी चाणाक्ष नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही.
या पोस्टरमध्ये एका कोरीव खडकाच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमार हातात मशाल घेऊन दिसत आहे. त्याच्या बाजूला जॅकलिन फर्नांडिस असून तिच्या हातात टॉर्च आहे. हातात टॉर्च असताना पुन्हा मशाल घ्यायचं कारण काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
तसंच, हे पोस्टर हुबेहूब नॅशनल ट्रेझर या चित्रपटासारखं असल्याचंही निरीक्षण नेटकऱ्यांनी नोंदवलं आहे. हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. जॅकलिनखेरीज नुशरत भरुचा ही देखील या चित्रपटात असणार आहे. हा चित्रपट डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केला आहे.
A glimpse into the world of #RamSetu.
In cinemas Diwali, 2022. pic.twitter.com/uZ9vIBFB9Z
— Akshay Kumar (@akshaykumar) April 28, 2022


























































