आचरेकरांच्या आठवणींसह शिष्यांनी साजरी केली गुरुपौर्णिमा

 

ज्यांनी शिस्तीचे धडे दिले, ज्यांनी सदैव दीपस्तंभासारखं आम्हाला योग्य मार्ग दाखवला, ज्यांनी प्रेमाने आणि रागाने पाठीत धपाटे मारत मैदान मारण्याची कला शिकवली अशा गुरु रमाकांत आचरेकरांप्रती त्यांच्या शिष्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञता व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील त्यांच्या स्मारकाजवळ त्यांचे दिग्गज शिष्य एकवटले आणि त्यांनी त्यांच्या स्मृतींना वंदन केले. याप्रसंगी शिष्यांनी आपल्या आठवणी ताज्या केल्यामुळे वातावरण भावुक झाले होते.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत प्रथमच द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त रमाकांत आचरेकर यांना वंदन करण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या स्मारकाच्या येथे प्रथमच गुरुवंदनाचा कार्यक्रम ठेवला होता. आचरेकरांनी आपल्या अद्भुत मार्गदर्शनामुळे हिंदुस्थानी क्रिकेट जगताला अनेक रथी-महारथी दिले आहेत. त्यांच्या स्मारकानंतर प्रथमच आलेली गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी शिष्य सुनील रमणी यांना छोटय़ाशा कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी माजी कसोटीपटू प्रवीण अमरे, समीर दिघे, जितेंद्र ठाकरे, पदम शास्त्राr, एमसीए कार्यकारिणी सदस्य नीलेश भोसले तसेच अनेक शालेय क्रिकेटपटूही आवर्जून उपस्थित होते.