
>> डॉ. समिरा गुजर जोशी
शबरीच्या कथेविषयी आपण मागील लेखात बोललो. वाल्मीकी रामायणात भेटणारी शबरी हे व्यक्तिमत्व अद्भूत म्हणावे असेच आहे. ती शबर समाजातून येते म्हणून ती शबरी आहे. म्हणजे ती आजच्या भाषेत आदिवासी आहे. मराठी साहित्यातही तिचा उल्लेख भिल्लीण असाच झाला आहे. समाजाच्या निम्नतम स्तरातून येऊन तिने मातंग ऋषींच्या आश्रमात मोठा आध्यात्मिक अधिकार आणि मोठी पदही प्राप्त केले आहे. ती एक स्त्री असून हे सारे साध्य करून ती मुक्तीची वाट चालते आहे.
आज आपल्याला ठाऊक असलेली शबरी ही भक्तीची परम कोटी गाठणारी भक्त म्हणून परिचित आहे. ती ज्ञानी नसेल, पण तिच्या मनातील भोळा भाव परमेश्वराला प्रिय आहे. अज्ञ पण श्रद्धावान भक्त परमेश्वराला प्रिय असतात हे ह्या कथेतून आज लक्षात येणारे तात्पर्य आहे. कथा कालानुरूप कसा वेगवेगळा आकार घेतात हे ह्या कथेच्या निमित्ताने पाहायला मिळते.
वाल्मीकी रामायणाव्यतिरिक्त कितीतरी रामायणे प्रचलित आहेत. अध्यात्म रामायण, रामचरित मानस, रंगनाथ रामायण, कंबन रामायण अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. महाराष्ट्रात संत एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण आहे, मोरोपंतांनी लिहिलेली 108 रामायणे आहेत. पण गंमत म्हणजे यातील कुठल्याही रामायणात उष्टय़ा बोरांचा उल्लेख नाही.
अध्यात्म रामायणात ती राम-लक्ष्मणांचे स्वागत करताना त्यांना फळं अर्पण करते, हे सांगितले आहे. अमृताहून गोड अशी ही फळं आहेत. पण यापेक्षा अधिक काही सांगितलेले नाही. पण त्या ठिकाणी शबरी म्हणते की, “माझ्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मी तुमची वाट बघत होते. तुम्ही आलात, तुमचे दर्शन झाले, मी धन्य झाले. मी एक स्त्री आहे, नीच जातीत माझा जन्म झाला आहे, तरी मला तुमचे दर्शन घडले ही किती भाग्याची गोष्ट आहे. हे भाग्य तर माझ्या गुरूंनाही प्राप्त झाले नाही.” यावर भगवान राम तिला उपदेश करतात की, भक्तांमध्ये स्त्री-पुरुष, जाती, वर्ण, आश्रम या कोणत्याही गोष्टीवरून भेद होत नाही. सर्व भक्त मला सारखेच प्रिय आहेत.
रामचरित मानसमध्येही ह्या प्रसंगाचे भक्तिमय वर्णन येते.
सबरी देखि राम गृह आए।
मुनि के वचन समुझि मन भाए।।
सादर जल लै चरन पखारै।
पुनि सुंदर आसन बैठारे।।
कंदमूलफल सुरस अति दिए राम कहुँ आनि।
प्रेम सहित प्रभु खाये, बारंबार बखानि।।
इथे तिने कंदमुळं, फळं देऊन स्वागत केले आणि प्रभू श्रीरामांनी ती कौतुकाने खाल्ली ह्याचा उल्लेख आहे…पण ती फळं बोरंच होती आणि उष्टी होती असा कोणताही उल्लेख नाही. मग हा उष्टय़ा बोरांचा उगम कोणता? तर तो उडिया भाषेतील प्रसिद्ध जगमोहन रामायण किंवा दांडी रामायण म्हणून प्रसिद्ध असणाऱया रामायणात आला आहे. तिथे शबरीने रामाला सुंदरी या जातीचे आंबे अर्पण केले आहेत. त्या आंब्यावर दाताच्या खुणा आहेत. ह्या रामायणाचे लेखक आहेत बलरामदास.
त्यांचा काळ साधारणपणे 15 वे शतक मानला जातो. राजा प्रतापदेव रुद्राच्या दरबारी ते मंत्री होते, पण आध्यात्मिक साक्षात्कारानंतर त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला. त्यांनी अनेक अन्यायकारी सामाजिक रूढींचा निषेध केला. जातीच्या बंधनांचा त्यांनी निषेध केला. उडिया भाषेतील पहिले विस्तृत आणि संपूर्ण रामायण त्यांनीच लिहिले. तेथील पंच सखा म्हणजे पाच श्रेष्ठ कवींपैकी एक ते आहेत. त्यामुळे त्यांनी शबरीच्या कथेला दिलेले हे वळण त्यांच्या विचारांना अनुसरून असेच आहे असे म्हटले पाहिजे.
पुढे ह्या कथेचे पडसाद अन्यत्रही उमटले. प्रियदासांनी व्रज भाषेत लिहिलेल्या भक्तीरस प्रबोधिनी या काव्यात उष्टय़ा बोरांचा उल्लेख आला आहे. अशा प्रकारे ही उष्टय़ा बोरांची गोष्ट कित्येक शतके साकार होत होती हे लक्षात येते.
मध्ययुगीन भारतात भक्तिमार्गाची जी लाट उचंबळून आली, त्यातून या गोष्टीचा जन्म झाला आहे. पण ही गोष्ट त्या बोरांप्रमाणेच अतिशय गोड असल्यामुळे तितकीच लोकप्रियही झाली आहे.
याच कथेचे गीत-रामायणात सुंदर गीत होते-
धन्य मी शबरी श्रीरामा। लागली श्रीचरणे आश्रमा।।
त्यामध्ये शबरी लक्ष्मणाला म्हणते, या बोरांकडे असे साशंक नजरेने का पाहतो आहेस? या ज्या दातांच्या खुणा आहेत, त्या पक्ष्यांनी चोची मारल्यामुळे निर्माण झालेल्या खुणा नाहीत. माझ्याच दातांच्या खुणा आहेत. पण ही बोरे उष्टी कशी म्हणायची?
का सौमित्री, शंकित दृष्टी?
अभिमंत्रित ती, नव्हेच उष्टी
या वदनी तर नित्य नांदतो, वेदांचा मधुरिमा…
माझ्या मुखातून नित्य रामनामच उमटत असल्यामुळे ही फळे उष्टी नव्हेत, तर अभिमंत्रित झाली आहेत. या कथेतून जे सांगायचे ते तात्पर्य, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांनी किती सहजपणे सांगितले आहे.
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)