
हाथरसची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ही भेट संपल्यानंतर हाथरसची घटना कळताच तिचा तीव्र निषेध केला. यासंदर्भात लखनौला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचीही भेट घेतली. मात्र त्यावेळी हाथरसला भेट देण्यास जिल्हा प्रशासनाने सर्वपक्षीय नेत्यांना अडविल्याने 2 ऑक्टोबरला हाथरसला जाऊ शकलो नाही. लवकरच हाथरसला जाऊन पीडित दलित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेणार असून त्यांना संरक्षण मिळवून देऊ, असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी केला.
हाथरस येथील घटनेनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्याकर टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले हे नटींच्या घोळक्यात होते असा आरोप केला होता. त्यावर खुलासा करताना आठवले यांनी मी नटींच्या घोळक्यात नसतो तर नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. दलित अत्याचाराविरुद्ध लढणारा मी मूळ पँथर आहे. जिथे जिथे महिलांवर, दलितांवर अत्याचार होतात तिथे तिथे आम्ही त्या त्या महिलेची बाजू घेत आलो आहोत. दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत. कंगना राणावत प्रकरणातही आम्ही कधीही खासदार संजय राऊत यांच्याकर टीका केली नाही ते आमच्यावर टीका करीत असले तरी मी त्यांच्यावर नाराज नाही. ते माझे मित्र आहेत, असेही आठवले पुढे म्हणाले.

























































