
निवडणूक अजून जाहीर झाली नाही तोवर मिंधे गटात जागावाटपावरून धुसफूस सुरू झाली आहे. गजानन कीर्तिकरांच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघावर रामदास कदम यांनी दावा सांगितला आहे. मात्र मला तिकीट दिले नाही तर मी विरोध करणार, असा इशारा कीर्तिकर यांनी दिला आहे.
कीर्तिकरांचे आता वय झाले आहे. त्यामुळे माझा मुलगा सिद्धेश कदम याला उमेदवारी द्या अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती. कीर्तिकर यांनी आज एका टीव्ही वाहिनीशी बोलताना त्याला प्रत्युत्तर दिले. एका घरात दोन भावांना तिकीट देता येत नाही, असे ते म्हणाले. गेली दहा वर्षे मी उत्तर-पश्चिम मतदारसंघात काम केले आहे आणि पुन्हा निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला आहे, असे कीर्तिकर यांनी म्हटले आहे. मला तिकीट द्यायचे नसेल तर चांगल्या व्यक्तीला द्यावे असे सांगत त्यांनी सिद्धेश कदम हे त्या जागेसाठी पात्र नसल्याचेच कीर्तिकर यांनी स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच रामदास कदम हे स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करण्यापेक्षा आनंदराव अडसूळ किंवा त्यांचा मुलगा अभिजित यांच्याबद्दल का बोलत नाहीत, असा सवालही त्यांनी केला आहे.




























































