रामदेव बाबांची मोदी-शहांना ‘जडीबुटी’; महागाई महागात पडेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशभरात केवळ पेट्रोल-डिझेलचीच दरवाढ नव्हे तर एकूण महागाईचा उडालेला भडका विझवला नाही तर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारला ही महागाई महागात पडेल, अशी ‘जालीम’ जडीबुटी ‘योगगुरू’ बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आज दिली. ते ‘एनडीटीव्ही’च्या युवा कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात बोलत होते.

तुमचा पंतप्रधान मोदी यांच्यावर 2014 सालाइतकाच विश्वास आजही आहे काय, या प्रश्नावर बाबा रामदेव यांनी उत्तर देण्याचे अर्थातच टाळले. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत आपण भाजपचा प्रचार अजिबात करणार नाही, असे त्यांनी जाहीर करून टाकले. काही लोक मोदी सरकारच्या धोरणांची स्तुती करताना सध्या दिसतात. पण अनेक धोरणांमध्ये तातडीने दुरुस्त्या करण्याची हीच वेळ आहे. अन्यथा भाजप सरकारची धडगत नाही, असा इशाराच रामदेव बाबांनी दिला. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणून ते किमान कराच्या श्रेणीत ठेवले पाहिजे, असे बाबा रामदेव म्हणाले. मोदींवर टीका करणे हा तर जनतेचा मूलभूत अधिकार आहे, असेही ते म्हणाले.

राहुल गांधींचे कौतुक
बाबा रामदेव यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे पहिल्यांदाच भरभरून कौतुक केले आहे. राहुल गांधी यांनी राजकारणाला गंभीरपणे घेतले असून ते हल्ली मेहनत करताना दिसतात, अशा शब्दांत बाबा रामदेव यांनी त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. माझा राहुल गांधींवर वैयक्तिक राग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी राजकारणापासून आता अलिप्त झालो आहे. सर्व पक्ष मला सारखे आहेत. मी स्वतंत्र आहे. पूर्वीही मी उजवा किंवा डावा कधी नव्हतोच. मी आधुनिक विचारांचा आणि फक्त कडवा देशभक्त आहे.
– बाबा रामदेव, योगगुरू

summary-ramdev baba slams bjp govt over inflation