
सामना ऑनलाईन । हरिद्वार
या देशात जे लोक माझ्यासारखे अविवाहित राहतील त्यांचा विशेष सन्मान करण्यात यावा. त्याचप्रमाणे जे लोक लग्न करतील आणि दोनपेक्षा अधिक अपत्यांना जन्माला घालतील त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, अशी मागणी योगगुरू रामदेवबाबा यांनी केली आहे. योगगुरूंच्या या मागणीने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
हरिद्वार येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदेवबाबा यांनी ही मागणी केली. हा राजकीय आणि राष्ट्रीय मुद्दा आहे. हिंदुस्थानची लोकसंख्या कमी होती तेव्हा जादा मुलांना जन्माला घालण्याचे समर्थन करण्यात आले. दहा अपत्यांना जन्माला घालण्याचेही आवाहन करण्यात आले, असे सांगतानाच ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे आणि ज्यांची गरज आहे त्यांनी मुलांना जन्माला घालावे. पण दोन मुले आम्हालाही आमच्या योगप्रसाराच्या कार्यासाठी द्यावीत, असे रामदेवबाबा म्हणाले. सध्या देशाची लोकसंख्या सवा कोटीपर्यंत गेल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यापूर्वीही केले होते खळबळजनक भाष्य
रामदेवबाबा यांनी यापूर्वीही विवाह आणि संततीबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. अविवाहित असणे हेच आपल्या यश आणि सुखाचे रहस्य असल्याचे त्यांनी यापूर्वी म्हटले होते. आनंदी राहण्यासाठी पत्नी आणि मुलांची गरज नाही. अविवाहित असतानाही आपण सुखी राहू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते. आता तर त्यांनी दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱयांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
summary- ramdev baba speaks about family planing



























































