
सामना प्रतिनिधी । माजलगाव
बीड जिल्ह्यातील माजी आमदार बाबुराव आडसकर यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त सोमवारी भाजप नेते रमेश आडसकर यांनी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 5 लाख रुपयांची मदत जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपूर्द केली. माजलगाव मतदारसंघातील आडस या गावी झालेल्या या कार्यक्रमात बोलताना मुंडे म्हणाल्या की, बाबुराव आडसकर यांनी व माझ्या वडिलांनी आयुष्यभर समाजातील तळागळातील लोकांच्या कल्याणासाठी काम केले आहे. आता ते दोघेही हयात नसल्याने माझे आणि रमेश आडसकरांचे दुःख सारखेच आहे. रमेश आडसकरांना भविष्यात योग्य ती संधी देऊ असे सूचक उदगार पंकजा मुंडे यांनी काढले.
आडसकरांनी दिलेली 5 लाखांची मदत पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी वापरण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या. रमेश आडसकर म्हणाले की, राजकारणात पद मिळाले किंवा नाही मिळाले तरी सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याचा माझ्या वडिलांचा वसा मी आयुष्यभर सोडणार नाही. या कार्यक्रमाला माजलगाव, धारूर, केज, वडवणी, अंबाजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला आमदार आर.टी. देशमुख, संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी आमदार शिवाजीराव पंडित, मोहनराव सोळंके, बदामराव पंडित, भीमराव धोंडे, मोहन जगताप, पापा मोदी, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, यांच्यासह बीड जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.



























































