
भारतीय जनता पक्ष देशातील लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केली जात आहे. महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटकातील मतचोरी राहुल गांधी यांनी उघड केली आहे. लोकशाही व संविधान आज धोक्यात असून ते वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत, ही लढाई मोठी व कठीण आहे. पण आपण सर्वजण राहुलजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा लढा जिंकू असे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊन, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम संदीप, यु बी. व्यंकटेश, रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे, संजय दत्त रविंद्र दळवी, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, देश कठीण परिस्थितीतून जात आहे. शेजारी देशांशी आपले चांगले संबंध नाहीत, अमेरिका भारताला धमकी देत आहे पण पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अमेरिकाच काय कोणत्याही देशाने भारताला धमकी देण्याचे धाडस केले नाही. राहुल गांधी चीनबद्दल काही बोलले तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यावर टिप्पणी करतात. आता न्यायालय देशप्रेमी कोण हे ठरवणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला. महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार सर्वात भ्रष्ट असून कृषी मंत्री विधानसभेत रमी खेळतो, तर गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात असे चेन्नीथला म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत चेन्नीथला म्हणाले की, राहुल गांधी यांनी प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले त्यावर आयोगाने उत्तर दिले पाहिजे पण फडणवीस उत्तर का देत आहेत. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत का निवडणूक आयुक्त? असे चेन्नीथला म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी हा प्रदेशाध्यक्षच आहे. जे गेले ते जाऊ द्या, गेले ते कावळे होते व राहिले ते मावळे आहेत आणि मी तुमच्या बरोबर आहे असे आश्वस्त करत दोन दिवसांची कार्यशाळा संपली असून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. आता Action, action आणि action वरच भर द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत विजय खेचून आणा व काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरचा पक्ष करा, असे आवाहनही सपकाळ यांनी केले.
काँग्रेसला नेरेटिव्ह व परसेप्शनची गरज नाही- पवन खेरा
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा यावेळी नेरेटिव्ह या विषयावर बोलताना म्हणाले की, जे सरकार व पक्ष काम करत नाही त्यांना नेरेटिव्ह व परसेप्शनची गरज असते काँग्रेस पक्षाला त्याची गरज नाही. भाजपाने फक्त एक खोटी वातावरण निर्मिती करण्याचे काम केले. काँग्रेसचा रस्ता हा सत्याचा आहे, तो कठीण आहे पण त्याच मार्गाने काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून चालत आला आहे व यापुढेही याच मागाने वाटचाल करेल. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरुंनी लोकशाही व संविधानाचा रस्ता निवडला आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे ठरवले याच रस्त्याने आज राहुल गांधीही जात आहे. काँग्रेस पक्षाला मोठा जाज्वल्य इतिहास आहे. 54 वर्षांच्या सत्तेत जनतेची भरपूर सेवा केली व देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले हे जनतेपर्यंत पोहचवा.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवर यावेळी म्हणाले की, राज्यातील भाजपा युतीच्या सरकारने 10 लाख कोटीचे कर्ज करून ठेवले आहे व 1 लाख 78 कोटी रुपयांची देणी बाकी आहेत. महाराष्ट्राला देशोधडीला लावले आहे. सहा महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत. शिक्षक भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असून हा भ्रष्टाचार व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेऊन काम करावे सर्वजण तुमच्या पाठीशी उभे आहेत असे वडेट्टीवार म्हणाले.
माजी मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले की, काँग्रेस पक्षाची विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाची राज्यात आजही मोठी ताकद आहे, 14 खासदार आहेत, आमदारांची संख्या कमी असली तरी आवाज कमी नाही. आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा लढवय्या आहे. जोमाने काम करा व काँग्रेस पक्षाला गत वैभव प्राप्त करुन द्या असे आवाहन करत आपल्याला राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे असे देशमुख म्हणाले.