मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवार उत्सुक

बीसीसीआयकडून राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीचा कायापालट करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेला रमेश पोवार याच्यासोबतचा करार वाढवण्यात येणार नाही. याचमुळे हिंदुस्थानचा माजी खेळाडू रमेश पोवार आता मुंबई क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी उत्सुक आहे. याबाबतची मागणीही त्याच्याकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (एमसीए) करण्यात आली आहे.

एमसीएकडून क्रिकेट सुधारणा समितीची निवड करण्यात आली असून हीच समिती मुंबईच्या विविध वयोगटांच्या संघाच्या प्रशिक्षक, निवड समिती सदस्यांची निवड करणार आहे. लालचंद राजपूत, राजू कुलकर्णी व समीर दिघे यांच्या क्रिकेट सुधारणा समितीकडून 14 सप्टेंबरला मुलाखती घेऊन 24 कोचेसची यादीही तयार करण्यात आली आहे. सुलक्षण कुलकर्णी, सलील अंकोला या दोन व्यक्ती मुंबईच्या सीनियर संघाचे प्रशिक्षकपद मिळवण्याच्या रेसमध्ये असून अमित पागनीसकडेही डार्क हॉर्स म्हणून बघितले जात आहे. आता एमसीएकडून रमेश पोवारची मागणी मान्य होते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

अनुभव मोलाचा

रमेश पोवार याने मुंबईच्या संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. तसेच हिंदुस्थानसाठी तो कसोटी तसेच वन डे सामनेही खेळलाय. 2015 सालामध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमधून तो निवृत्त झाला. गेल्या पाच वर्षांमध्ये त्याने कोचिंगचा अनुभव संपादन केलाय. राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमी, एमसीए इनडोअर ऍकॅडमी आणि हिंदुस्थानी महिला संघाचा प्रमुख कोच म्हणूनही त्याने भूमिका बजावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या