
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील हिंदुत्ववादी चळवळीचे कार्यकर्ते शिवसेना ग्राहक मंचाचे उपजिल्हाप्रमुख, शेतकरी सेनेचे उपतालुकाप्रमुख आचंलगावचे विद्यमान उपसरपंच, साहित्यिक,कवी र.फ. उर्फ रमेश शिंदे यांचे रविवारी अपघाती निधन झाले. रात्री ७ वाजता आंचलगाव रेल्वे क्रासिंगजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या बातमीने तालुक्यातील राजकिय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
रविवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास शिंदे घरी परतत असताना आंचलगाव रेल्वे क्रासिंगजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे वर्चस्व असलेल्या येसगाव नजीकच्या आंचलगाव ग्रामपंचायतीचे गेली २८ वर्षे सरपंचपद शिंदे यांच्याकडे होते. यावेळी त्यांच्या पत्नी सरपंच तर ते उपसरपंच होते. समाजसेवेच व्रत घेतलेला एक उच्च शिक्षीत, साहित्यीक, हिंदुत्ववादी विचारसरणी असलेला एक अजातशत्रू म्हणुन त्यांची ओळख होती. राजकिय कारकिर्दीची सुरवात त्यांनी स्व. नामदेवराव परजणे यांचे समर्थक म्हणुन केली. पुढे भाजप आणि नंतर शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. त्यांच्या अपघाती निधनाबद्दल शिवसेनेचे परेश पाटील,नगर उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, ग्राहकमंच जिल्हाप्रमुख मुकूंद सिनगर, शहरप्रमुख अस्लम शेख, नगराध्यक्ष विजय वहाडणे आदिंनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने तालुक्यातील शिवसैनिकासह राजकिय वर्तुळात शोककळा पसरली आहे. रात्री ८ वाजता त्यांचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. रात्री उशीरापर्यत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे कोपरगाव ग्रामीण पोलीसांचे काम सुरू होते.































































